नागनाथ शिंगाडे, बातमीदार
तळेगाव ढमढेरे, ता. ८ :
अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या निघोज येथील श्री.स्वामी समर्थ सहकारी बँकेला सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेरीस ४ कोटी ४३ लाखाचा ढोबळ नफा झाला असून, बँकेच्या सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा २ कोटी २० लाख झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.अशोकराव शेळके यांनी दिली. ३१ मार्च रोजी बँकेची ताळेबंद, नफा-तोटा व आर्थिक पत्रके तयार करण्यात आली. बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी ऍड.शेळके यांनी माहिती दिली, ते म्हणाले,बँकेच्या ठेवींमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ३४.०४ कोटीची वाढ होऊन बँकेच्या एकूण ठेवी १७१.२८ कोटी आहेत. गतवर्षीअखेर कर्जवाटपामध्ये ७.५८ कोटींची वाढ होऊन एकूण कर्जवाटप ८२.४४ कोटी रुपये आहे. बँकेचे एकूण भागभांडवल ७.३४ कोटी रुपये असून गुंतवणूक १०४.७९ कोटी आहे. कर्जवसुलीचे प्रमाण ९८.६७% असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिना अत्यंत खडतर गेल्याने थकबाकीचे प्रमाण १.३३% आहे. बँकेचा ग्रॉस एन.पी.ए १.२२% असून निव्वळ एन.पी.ए ०% आहे. बँकेने सातत्याने ग्रामीण भागातील ग्राहक, उद्योजक व शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. बँकेच्या अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर, सणसवाडी, कोरेगाव, केसनंद, वाघोली,
चंदननगर आदी मिळून एकूण ११ शाखा असून टाकळी ढोकेश्वर येथे स्वमालकीची अद्ययावत इमारत आहे. रिझर्व्ह बँकैच्या सूचनेनुसार बँकेने “आर्थिकदृष्ट्या सक्षम बँकेचे” सर्व निकष पूर्ण केलेले असून महाराष्ट्र शासनाचा “सहकारनिष्ठ” पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय बँक असोसिएशनचे अनेक पुरस्कार मिळविले आहेत. बँकेने ग्राहकांसाठी कोअर बँकिंग, सिटीएस क्लिअरिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस बँकिंग,
ड्राफ्ट, मिसकॉल अलर्ट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उत्कृष्ट प्रशासन व व्यवस्थापन यांच्या बळावर बँकेने ग्राहकांची सेवा करून प्रगती साधली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना भविष्यकाळात ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बँकेचे अध्यक्ष श्री शेळके, उपाध्यक्ष शांताराम लंके व संचालक संतोष थोपटे यांनी सांगितले.
