कोरोनामुळे पोल्‍ट्री उद्योगाचे १२० कोटींचे नुकसान

Smiley face < 1 min

ई ग्राम : चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे वातावरण असताना या विषाणूचा फैलाव चिकनमधून होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांमुळे मागणी घटल्याने गेल्या २० दिवसांत पोल्ट्री उद्योगाचे सुमारे १२० कोटींचे नुकसान झाले आहे, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत जनजागृती होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून घटलेली मागणी वाढत असून, चिकनची बाजारपेठ पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

याबाबत पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची ब्रॉयलर चिकनची मागणी दिवसाला २ हजार ८०० टनांची आहे. मात्र, कोरोनो विषाणूबाबतच्या अफवेमुळे आणि समाजमाध्यमांमधील फिरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे गेल्या २० दिवसांत चिकनची मागणी ६०० टनांनी घटली आहे. यामुळे १३० रुपये प्रतिकिलोच्या बाजारभावानुसार गेल्या २० दिवसांत सुमारे १०० ते १२० कोटींचे नुकसान झाले आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने या अफवांबाबत केलेल्या जनजागृतीमुळे बाजारपेठ पुन्हा पूर्वपदावर येत असून, गेल्या २० दिवसांत १ हजार ६०० टनांपर्यंत कमी झालेली मागणी आता २ हजार २०० टनांपर्यंत वाढली आहे. काही दिवसांत ही बाजारपेठ पूर्वपदावर येईल असे आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’

वाचा  बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान प्राप्त न झालेल्या शेतक-यांनी आवश्‍यक पुरावे सादर करावे

लिफ्टींग दर ४० रुपयांवर
कोरोना विषाणूच्या अफवेमुळे गेल्या १५-२० दिवसांपासून चिकनची मागणी ५० ते ६० टक्क्यांनी घटली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची दररोजची मागणी सुमारे १५० ते २०० टन एवढी असते. ती मागणी आता १०० टनांपर्यंत घटली आहे. तर चिकनचे १८० रुपये असणारे दर आता १२० रुपये आहेत. तर आमच्या जिवंत कोंबडीचे खरेदीचे दर ७५ ते ८० रुपयांवरुन, ४० रुपये प्रति किलो पर्यंत झाले आहे. मात्र, कोंबडीपासून कोरोना विषाणूचा फैलाव होत नसल्याचे समोर येत असल्याने मागणी वाढायला सुरुवात झाली आहे, असे पुणे जिल्हा ब्रॉयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

वाचा  जयहिंद प्रतिष्ठानने पुढे केला एक हात मदतीचा !
Download App