नगर : गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाच्या भितीचे वातावरण आहे. या विषाणूच्या भितीने राज्यभरातील अनेक मांसाहार करणाऱ्यांनी चिकन खाणे सोडून दिले आहे. मोठ्या प्रमाणात चिकन खाणे बंद झाल्याने यांचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे.
तालुक्यातील अनेक गावात शेतीला एक जोडव्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाचा उद्योग केला जातो. या व्यवसायात लहान पिल्ले घेऊन ती मोठी करून विकली जातात.
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने अनेकांनी चिकन आणि अंडी खाणे बंद केले आहे. जानेवारी महिन्यात पोल्ट्री चिकनचे भाव १७० रुपये प्रतिकिलो होते, तर अंडी साडेचारशे रुपये शेकडा होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात चिकनचे भाव ८० ते १०० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत, तर अंड्यांचे भाव साडेचारशे वरून तीनशे ते साडेतीनशे रुपयांवर आले आहेत.
पोल्ट्री व्यावसायिकांना फटका
अनेक शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे खात्रीशीर उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून पाहतात. राज्यातील अनेक कंपन्या या व्यवसायात असून, शेतकऱ्यांशी त्यांनी करार केले आहेत. कोरोनामुळे ग्राहक झपाट्याने कमी झाल्याने पक्ष्यांच्या किंमती लक्षणीयरीत्या उतरल्या आहेत. त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे.
