जागतिक स्थितीमुळे कापसात नरमाईचा कल

Smiley face 2 min

ई ग्राम : यंदाच्या हंगामात (२०१९-२०) कापसाचे जागतिक बाजारपेठेतील दर अतिरिक्त शिल्लक साठ्यांमुळे दबावात असतील, असे दी इंटरनॅशनल कॉटन ॲडव्हायजरी कमिटीने (आयसीएसी) म्हटले आहे. जगात कापसाच्या उत्पादनात वाढ आहे, तर मागणीत नरमाईचा कल दिसत आहे.

निर्यातीवर परिणाम
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या थैमानामुळे भारतातून होणाऱ्या कापूस गाठींची निर्यात मंदावली आहे. जानेवारीत एकूण सात ते आठ लाख गाठी निर्यातीचे सौदे झाले होते. त्यातील जवळपास साठ टक्के निर्यात चीनला तर उर्वरित माल बांगलादेश आणि व्हिएतनामला जाणार होता. चीनला होणारी निर्यात रखडली आहे.

चीनकडील एकूण खपात घट
जगात कापसाचा सर्वांत मोठा ग्राहक अशी चीनची ओळख आहे. अमेरिकासोबतच्या नव्या व्यापार करारामुळे चीनमध्ये कापसाचा खप वाढण्याची आशा होती. परंतू कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अर्थव्यवस्थेच्या वाढीला तात्पुरता लगाम बसला परिणामी कापसाचा खप घटला आहे.

वाचा  थोरांदळे गावची यात्रा 'कोरोना'मुळे रद्द; गजबजलेला परिसर यंदा सुनासुना

‘सीसीआय’कडील खरेदीत सहा पट वाढ
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) या सरकारी महामंडळाने ऑक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरू केली. आत्तापर्यंत ५८ लाख गाठी खरेदी करण्यात आल्या. चालू वर्षांत ‘सीसीआय’ने ६५ ते ७० लाख गाठी कापूस खरेदीचे उदिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी ‘सीसीआय’ने ११ लाख गाठी कापूस खरेदी केला होता. यंदा सहा पटीने खरेदी वाढली आहे. विविध अनुमानांनुसार, भारतात ३५० ते ३६० लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यातील ५५ टक्के माल बाजारात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील कापूस उत्पादनात १३.६ टक्के वाढ अपेक्षित आहे.

वाचा  केंद्र सरकारने केली ८० हजार टन हरभऱ्याची आयात, बाजारपेठेमध्ये मंदी.

यंदाच्या हंगामात कापसाचे जागतिक शिल्लक साठे ८.२ कोटी गाठी राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी खात्याने (यूएसडीए) वर्तवला आहे. गेल्या वर्षी भारतात २२ लाख गाठी आयात झाल्या होत्या तर यंदा २३ लाख गाठी आयात होतील, असे ‘यूएसडीए’ने म्हटले आहे. चालू हंगामात भारताची कापूस निर्यात ३८ लाख गाठींवरून ३६ लाख गाठींवर येईल, असा अंदाज आहे. भारतातील शिल्लक साठे १२७ लाख गाठींवरून १३० लाख गाठींपर्यंत वाढतील, असेही ‘यूएसडीए’ने म्हटले आहे.

आयाती व शिल्लक साठ्यांविषयक विविध जागतिक संस्था अनुमाने जाहीर करत असतात. त्यातील आकडेवारीत थोडाफार फरक असतो. या वर्षी सर्वच अनुमानांनुसार भारतातील व जागतिक कापसाच्या शिल्लक साठ्यांत वाढ अनुमानित आहे. त्याचे प्रतिबिंब सध्याच्या बाजारभावात पडले आहेत.

जागतिक उत्पादन व शिल्लक साठे

  • चालू वर्षांत २.६७ कोटी टन जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्के वाढ
  • जागतिक कापूस खप २.६२ कोटी टन अनुमानित
  • शिल्लक साठा धरून यंदा कापसाचा पुरवठा ४.४९ कोटी टन
  • गेल्या वर्षी एकूण पुरवठा ४.४३ कोटी टन
  • चालू वर्षांत जागतिक शिल्लक साठे १.८७ कोटी टन अनुमानित
  • गेल्या वर्षी शिल्लक साठे १.८२ कोटी टन
वाचा  भारतातून श्रीलंकेला होणार कांदा निर्यात

Download App