राज्यसभेसाठी भाजपकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी?

Smiley face < 1 min

मुंबई : राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनपेक्षितपणे एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येताना दिसत आहे. भाजप श्रेष्ठींनी राज्यसभेसाठी एकनाथ खडसे, उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या वादामुळे नाथाभाऊंचे राजकीय पुनर्वसन सातत्याने लांबणीवर पडत राहिले. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाने त्यांना उमेदवारीही नाकारली होती. भाजपची सत्ता गेल्यावर एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत ही खदखद बोलून दाखविली होती. परिणामी राज्यातील भाजप नेत्यांसमोर पेच उभा राहिला होता.

वाचा  कायमस्वरुपी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - अजित पवार

त्यामुळेच आता एकनाथ खडसे यांना थेट दिल्लीत पाठवून राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. खडसे यांनी राज्यसभेत जावे, असा राज्यातील नेत्यांचा आग्रह असल्याचे समजते. त्यामुळे आता खडसे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या सातही जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी प्रथमच एकत्र लढणार आहे. महाविकासआघाडीचे संख्याबळ पाहता सातपैकी चार जागांवर त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यापैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान यांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने अद्याप आपली नावे जाहीर केलेली नाहीत.

वाचा  अशोक चव्हाणांनी दिली फडणवीस सरकारच्या 'या' कामास क्लीन चीट
Download App