टंचाई निवारण्यासाठी कृती आराखड्यावर मदार

Smiley face < 1 min

औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्याची मदार जानेवारी ते जून २०२० दरम्यानसाठी तयार केलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असणार आहे. तूर्त जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या पाच टॅंकरने पाणीटंचाईचे संकट कायम असल्याचे संकेत दिले आहेत.

ऑक्‍टोबर महिन्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट यंदा नसेल असे सर्वांनाच वाटले. परंतु, पडलेला हा पाऊस सर्वदूर समान नसल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीसाठ्यांची व भूगर्भाची तहान कायम राहिली. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण ६५ पैकी जवळपास २० ते २२ मंडळात गतपाच वर्षांत व यंदाही सरासरीइतका पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा सरासरी पाऊस अपेक्षेच्या पुढे जाऊन दिसत असला, तरी प्रत्यक्षात काही भागात यंदा पाणीटंचाईला सामोर जावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासू शकणाऱ्या ५६१ गावे व ५४ वाड्यांची संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी जानेवारी ते जून २०२० साठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे.

वाचा  मका, तुरीला हमीभावाच्या आतच दर

जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०२० अशा दोन टप्प्यांत या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३१८ गावे व ४४ वाड्यांसाठी ६५२ योजनांसाठी अंदाजे आवश्‍यक खर्च १६ कोटी ९९ लाख प्रस्तावित करण्यात आला. तर, दुसऱ्या टप्प्यात २४३ गावे व दहा वाड्यांच्या टंचाईच्या उपाययोजनांसाठी ४६० योजनांच्या पूर्ततेसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

वाचा  ३४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा, सरकार यादी जाहीर करणार

दोनही टप्पे मिळून जानेवारी ते जून २०२० दरम्यान जिल्ह्यातील ५६१ गावे व ५४ संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठीच्या ९११२ प्रस्तावित योजनांसाठी २८ कोटी ८२ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅंकरच्या फेऱ्या सुरु
औरंगाबाद तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या सांजखेडा येथे पाणीटंचाई निवारण्यासाठी दोन टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय पैठण तालुक्‍यातील बालानगर येथे दोन, तर गंगापूर तालुक्‍यातील आंबेगाव, हैबतपूर व मुस्तफाबाद या तीन गावातील पाणीटंचाई निवारण्यासाठी एका टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

वाचा  ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेचा 'सेस' फंड
Download App