कापसाच्या नरमाईमागील तत्कालिक व दीर्घकालीन कारणे

Smiley face 3 min

ई ग्राम : 2019-20 – ऑगस्ट – जुलै या हंगाम वर्षांत कापसाचे जागतिक दर अतिरिक्त शिल्लक साठ्यांमुळे दबावात असतील, असे दी इंटरनॅशनल कॉटन अॅडव्हायजरी कमिटीने (आयसीएसी) म्हटले आहे. जगात कापसाच्या उत्पादन वाढ आहे, तर मागणीत नरमाईचा कल दिसत आहे.

ज्या वेळेला भारत कुठल्याही वस्तूचा आयातदार वा निर्यातदार होतो, तेव्हा स्वाभाविकपणे संबंधित वस्तूचे वा पिकाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे ट्रेड होतात. आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी तर भारतातही मंदी असे साधे समीकरण तयार होते.

जागतिक उत्पादन व शिल्लक साठे

चालू वर्षांत जागतिक कापूस उत्पादन २.६७ कोटी टन अनुमानित असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्के वाढ आहे. जागतिक कपाशीचा खप २.६२ कोटी टन अनुमानित आहे.  गेल्या वर्षांतील शिल्लक साठे जमेस धरता चालू वर्षांतील एकूण जागतिक कापसाचा पुरवठा ४.४९ कोटी टन राहणार आहे. गेल्या वर्षी एकूण पुरवठा ४.४३ कोटी टन होता. चालू वर्षांत जागतिक शिल्लक साठे १.८७ कोटी टन अनुमानित आहेत. गेल्या १.८२ कोटी टन शिल्लक साठे होते. (आकडेवारी स्त्रोत आयसीएसी)

निर्यातीची पाईपलाईन थांबली :  चीनमध्ये कोरोना विषाणूच्या थैमानामुळे भारतातून होणारी कॉटन बेल्स निर्यातीची पोच थांबली आहे. जानेवारीत एकूणच सात ते आठ लाख बेल्स निर्यातीचे सौदे झाले होते. चार ते पाच लाख बेल्स, म्हणजेच जवळपास साठ टक्के चीनसाठी होणार होते.  उर्वरित माल बांगलादेश आणि व्हिएतनामला जाणार होता. चीनला जाणाऱ्या एकूण आयातीतील २.५ लाख बेल्सची निर्यात सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे रखडली आहे.

वाचा  कांदा बाजार आढावा : सोलापुरात सर्वाधिक २५०० रुपये

चीनकडील एकूण खपात घट

जगात कॉटनचा सर्वांत मोठा ग्राहक अशी चीनची ओळख आहे. अमेरिकासोबतच्या नव्या व्यापार करारामुळे चीनमध्ये कॉटनचा खप वाढण्याची आशा होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अर्थव्यवस्थेवर वाढीवर तात्पुरता लगाम बसला आणि कॉटनचा अनपेक्षितपणे खप घटला. चालू हंगामात 3.7 कोटी बेल्स चीनमध्ये खपतील. आधी 3.8 कोटी बेल्स खपण्याचे अनुमान होते. 2.8 टक्क्यांनी खप घटणार आहे.

सीसीआयकडील खरेदीत सहा पटीने वाढ

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) या सरकारी महामंडळाकडील कॉटन बेल्सची खरेदी गेल्या ऑक्टोबरपासून सुरू झाली. आतापर्यंत 58 लाख बेल्सपर्यंत खरेदी झालीय. चालू वर्षांत सीसीआयने 65 ते 70 लाख बेल्स खरेदीचे उदिष्ट निर्धारित केले आहे. गेल्या वर्षी सीसीआयने 11 लाख बेल्स खरेदी केली होती. यंदा सहा पटीने खरेदी वाढली आहे.  विविध अनुमानांनुसार, भारतात 350 ते 360 लाख बेल्स उत्पादन होण्याचे अऩुमान आहे. त्यातील 55 टक्के मालाची आवक बाजारात आलीय.

वाचा  लासलगाव मध्ये कांद्याच्या आवकेत सुधारणा, बाजारभाव १७३० वर

भारतातील उत्पादनात 13.6 टक्क्यांनी वाढ

भारतातील कपाशीच्या उत्पादनासंदर्भात सरकारी तसेच खासगी संस्था आपली अनुमाने जारी करत असतात. त्यात कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) प्रमुख संस्था आहे. देशात 2019-20 – ऑक्टोबर-सप्टेंबरच्या हंगामात 354 लाख बेल्स उत्पादनाचे अनुमान ‘सीएआय’ने दिले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 13.6 टक्क्याची उत्पादन वाढ आहे.
सीएआयच्या अनुमानानुसार, चालू वर्षांत 42 लाख बेल्सपर्यंत निर्यात होईल, तर 25 लाख बेल्सपर्यंत आय़ात सिमित राहील.  देशांतर्गत कपाशीचा खप 331 लाख बेल्स असेल.

भारतातील शिल्लक साठ्यांत मोठ वाढ

गेल्या वर्षांतील शिल्लक साठ्यांच्या अनुमानात सीएआयने सुधारणा केली आहे. गेल्या महिन्यापर्यंत 24 लाख बेल्सचे शिल्लक साठे अनुमानित होते. सुधारित अनुमानानुसार ते 32 लाख बेल्सपर्यंत वाढवण्यात आले आहेत. यात प्रभाव आता चालू वर्षांतील शिल्लक साठ्यांवर दिसणार आहे. चालू वर्षी 30 लाख बेल्स शिल्लक साठ्यांचे अनुमान होते. आता सुधारित अनुमानानुसार 38.5 लाख बेल्सपर्यंत शिल्लक साठ्यांचा दबाव राहणार आहे.

वाचा  आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता

अमेरिकेच्या कृषी खात्याचे अनुमान

ऑगस्ट ते जुलै 19-20 मार्केटिंग वर्षांत कॉटन बेल्सचे जागतिक शिल्लक साठे 8.2 कोटी बेल्स राहण्याचे अनुमान
अमेरिकेच्या कृषी खात्याने (युएसडीए) फेब्रुवारीच्या मासिक रिपोर्ट्समध्ये दिले आहे.  जानेवारीत 7.9 कोटी शिल्लक बेल्सचे अनुमान होते. 3.7 टक्क्यांनी शिल्लक साठे वाढणार आहेत.

गेल्या वर्षी भारतात 22 लाख बेल्स आयात झाल्या होत्या तर यंदा 23 लाख बेल्स आयात होतील, असे अमेरिकी कृषी खात्याने म्हटले आहे. चालू हंगामात भारतातून कॉटन बेल्सची निर्यात 38 लाख बेल्स वरून 36 लाख बेल्सपर्यंत घटेल. भारतातील शिल्लक साठे 127 लाख बेल्स वरून 130 लाख बेल्सपर्यंत वाढतील, असेही ‘युएसडीए’ने म्हटले आहे.

आयाती व शिल्लक साठ्यांविषयक विविध जागतिक संस्था अनुमाने जाहीर करत असतात. त्यातील आकडेवारीत थोडाफार फरक असतो. तथापि, एकूण ट्रेंड समजण्यासाठी विविध संस्थांची अनुमानांची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. या वर्षी सर्वच अनुमानांनुसार भारतातील व जागतिक कापसाच्या शिल्लक साठ्यांत वाढ अनुमानित आहे. त्याचे प्रतिबिंब सध्याच्या बाजारभावात दिसले आहे.

Download App