ई ग्राम । नागपूर (प्रतिनिधी) : कृषीप्रधान देशात हवामान खात्याने आपली जबाबदारी ओळखत अचूक अंदाज वर्तविण्याचे काम करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान कार्यालयाच्यावतीने आयोजित एकदिवसीय संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी आशीष बिजवाल, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मोहोपात्रा, प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरचे उपमहासंचालक डॉ. एम. एल. साहू, केंद्रीय भूजल मंडळ नागपूरचे संचालक डॉ. पी.के. जैन यावेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, हवामान विषयक पूर्वसूचना ही पिकाच्या काढणीनंतरच्या प्रक्रियेमध्ये लाभदायक ठरल्याने पिकाचे नुकसान टळते. हवाई तसेच सुमुद्री वाहतुकीमध्ये पूर्वसुचना मिळाल्यानंतर संभाव्य धोका टळतो. हवामान अंदाज हे शेती तसेच इतर पूरक व्यवसायानासुध्दा फायदेशीर आहे. त्यामुळेच सरपंच, गावकरी तसेच लोकप्रतिनिधींना हवामानविषयक तंत्रज्ञान समजावून सांगावे याकरिता कृषी, हवामान व इतर संबंधित शासकीय विभागांनी परस्परांमध्ये संवाद, समन्वय साधावा. याव्दारे हवामान अंदाज व त्याच्या परिणामाबाबत योग्य तो प्रतिसाद मिळून कार्यक्षमता वाढेल.
मोहपात्रा यांनी जिल्हास्तरावरच्या हवमान अंदाजापासून तालुकास्तरावरील तसेच मंडळ स्तरावरील अंदाज वर्तविणे विभागाने सुरु केले असल्याची माहिती दिली. देशातील दोन हजार ठिकाणी ब्लॉक फोरकास्टिंग चालू केलेले आहे. समुद्री तसेच रोगाच्या संदर्भातील हवामानाचे अंदाजसुध्दा हवामान विभाग वर्तवित आहे. याचा वापर मत्स्यव्यवसाय तसेच साथीचे रोग प्रतिबंधीत करण्यासाठी होतो. नागपूर तसेच मुंबई येथील शहरातील हवामानविषयक अंदाज वर्तविण्यासोबतच विभागवारसुध्दा हवामान अंदाज वर्तविणे सुरु केले असल्याचे डॉ. मोहपात्रा यांनी सांगीतले. प्रास्ताविक प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच उपमहासंचालक डॉ. एम.एल. साहू यांनी केले.
