ई -ग्राम : ऐन काढणी-मळणीच्या काळात हरभऱ्याच्या बाजारभावात घट सुरू आहे. महिनाभरात एनसीडीईएक्स मार्च हरभरा वायदा पावणे पाचशे रुपयांनी घटला आहे. मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात मार्च वायदा 3986 पातळीवर ट्रेड झाला. आजघडीला अकोला स्पॉट लोकेशनला 4050 रुपये प्रतिक्विंटल दर असून, त्यातुलनेत वायदा कमी भावात उपलब्ध आहे.
डिसेंबर महिन्यात हरभऱ्याच्या बाजारभावात वाढ झाली होती. पेरण्यांचा वेग कमी असणे आणि थंडीत घट असल्यामुळे 2020 मार्च वायद्याने डिसेंबरमध्ये 4500 रुपये प्रतिक्विंटलची वरची पातळी गाठली होती. मात्र, जानेवारीत पेरण्यांची आकडेवारी आणि थंडीचे प्रमाण सुधारताच वायदा भावात जोरदार घट दिसली आह.
उच्चांकी पेरा: महाराष्ट्रात हरभऱ्याचा पेरा 21.7 लाख हेक्टरवर पोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत 65 टक्क्यांनी वाढ आहे. राज्यात रब्बीत सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याखाली वळते झाले आहे. बहुतांश उत्पादक क्षेत्रात बागायती पद्धतीने उत्पादन घेतले जाते. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिहेक्टरी उत्पादकता अन्य राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. यंदा सुमारे २५ ते ३० लाख टनापर्यंत उपलब्धता एकट्या महाराष्ट्रातच राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भूजल साठ्यात चांगली वाढ आहे. यामुळे कोरडवाहू तालुक्यातील क्षेत्र हरभऱ्याखाली वळते होतेय.
देशपातळीवरही उच्चांकी 107 लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पेरणीत 17 टक्के वाढ आहे. मध्यप्रदेशात 27 लाख हेक्टरवर पेरा असून, देशात पहिल्या क्रमांकावर आहे. या पाठोपाठ महाराष्ट्र आणि राज्यस्थान ही राज्ये संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यंदा मध्यप्रदेशातले क्षेत्र ३४ लाख हेक्टरवरून २७ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. मात्र, राजस्थान व महाराष्ट्रातील क्षेत्र वाढल्याने मध्यप्रदेशातील घट भरून निघाली आहे.
