विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Smiley face 2 min

पुणे : विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ, मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यासह काही ठिकाणी सोमवारी (दि.९) रोजी वादळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांचे, फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उद्या (दि.११) रोजी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात धुळीची वादळे उठून, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी (दि.१०) रोजी मराठवाड्यातील बीड येथे राज्यातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारी (दि.९) रोजी सकाळी यवतमाळच्या महागाव तालुक्यात आणि अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारनंतर विदर्भाच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात वाडेगाव आणि परिसरातील गावामध्ये वादळी पाऊस झाला. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास सोसायट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली. शेतातील गहू, लिंबू पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

वाचा  तापमानात चढ-उताराची शक्यता

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात पावसामुळे नुकसान झाले. मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील खानापूर शिवारात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे गहू, ज्वारी, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने हरभरा, गहू पिकांना फटका बसला.

मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, या स्थितीपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत. पूर्व आणि पश्‍चिम दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे. पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला असून, जोरदार वारे वाहून धुळीच्या वावटळी उठण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी दुपारनंतर ढग दाटून येत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, अनेक ठिकाणी तापमान ३३ अंशांच्या पुढे गेले आहे. कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा  उत्तर सोलापूर भागाला अवकाळीचा फटका

आज मंगळवारी (दि.१०) रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३३.२, नगर ३६.४, धुळे ३४.०, जळगाव ३५.४, कोल्हापूर ३३.१, महाबळेश्‍वर २७.६, नाशिक ३२.३, निफाड ३०.०, सांगली ३३.५, सातारा ३२.७, सोलापूर ३६.०, अलिबाग २७.८, डहाणू २८.९, सांताक्रूझ ३०.१, रत्नागिरी ३१.४, औरंगाबाद ३३.३, बीड ३८.०, परभणी ३४.४, नांदेड ३४.५, अकोला ४३.९, अमरावती ३२.६, बुलडाणा २७.५, ब्रह्मपुरी ३३.३, चंद्रपूर ३३.०, गोंदिया ३१.३, नागपूर ३२.५, वर्धा ३४.४, वाशिम ३४.४.

वाचा  अतिवृष्टी, पूरबाधितांचे पीक कर्ज माफ होणार
Download App