काही उजेड पडतोय का पहा ….?

Smiley face 4 min

ई ग्राम : जगभरातले सगळे पंतप्रधान सुद्धा तंतरले असतील ह्या दिव्यांच्या उपायामुळे.. अर्थात, ही वेळ राजकारण करण्याची अजिबातच नाहीय.. पण, कुणी करत असेल तर त्याला तसेच उत्तर देण्याची नक्कीच आहे. थाळीनादाच्या अफाट (अप)यशानंतर केवळ वस्तूनिष्ठ निर्णयच घेण्याची साधी बुद्धीही होऊ नये, हे ह्या देशाचे सुर्दैव आहे. कोणत्याही बोलण्यावर अंधविश्वास ठेवण्याआधी प्रत्येकाने स्वतःच्या विवेकबुद्धीला प्रश्न विचारा की, “पंतप्रधान असणार्‍या व्यक्तीने जे काम करायला पाहिजे, त्यातली एक तरी सजग कृती आपले पंतप्रधान करत आहे का ?

पंतप्रधान असून हे महाशय देशातल्या सध्य परिस्थितीवर एकही शब्द बोलले नाहीत. डॉक्टरांवर, पोलिसांवर होणारे हल्ले.. वाढती आपदा.. समूहाने होणारे धार्मिक कार्यक्रम ह्याविषयी चकार शब्दही काढला नाही. देशात वैद्यकीय सामग्रीचा तुटवडा भासू लागलाय.. आणि अशा स्थितीत सर्बियाला १८० टन मेडिकल सामग्री निर्यात केलीय. (अशा बातम्या झळकल्या आहेत.) आरोग्य व्यवस्थेच्या धोरणाविषयी काय बोलले मोदी? दहावी आणि बारावीच्या परीक्षांना जगण्याचा महामेरू मानणारा एक वर्ग आहे. त्यांच्या परिक्षा अधिकतर राज्यात अर्ध्यात सुटल्या आहेत. त्यांना किमान दिलासा वाटेल, असं काही भाष्य अपेक्षित होतं. आता आणखी काही प्रश्न पडताळून पाहूया.. ह्या सगळ्यांची उत्तर नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून अपेक्षित होती. कारण, जनता त्यांना त्यासाठीच ऐकत असते. अर्थमंत्री किंवा आरोग्यमंत्री हे कोण, हे जनतेला माहीतही नसते.

हातावर पोट असणार्‍या मजूर आणि अन्य घटकांच्या दररोजच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी इथे राज्यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. ती कुणाला का दिसत नसावी?.. दिसली तरी आमच्या पैशातून मुख्यमंत्री जेवण देत आहेत. असले जावईशोध लावले जात आहेत. कर काय फक्त राज्यालाच देता का?.. केंद्राला दिला जाणारा कर पण असतो. त्याचाही हिशोब मागा की.देशातली आरोग्यव्यवस्था आज कोणत्या अवस्थेत आहे? देशभरातील रुग्णांचा वाढता आकडा आणि काळजी त्यांच्या भाषणात कुठेही नव्हती. टेस्टींग कीट, डॉक्टरांना पुरविल्या जाणार्‍या वैद्यकीय सुरक्षा सक्षम नाहीत. आजमितीला ५० हून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास येते आहे. उपाययोजना का आहेत ह्यावर?. संवेदनशील भागात जाणार्‍या डॉक्टरांना पोलीस आणि आवश्यकतेनुसार लष्कराची मदत मिळायला हवी, ती मिळते आहे का?

वाचा  “मोकळ्या जागेत येऊन भारतमातेचे स्मरण करा”

इतके सगळे प्रश्न आ वासून उभे असताना, पंतप्रधान म्हणून देशाला संबोधित करताना हे महाशय जनतेलाच दिवे लावायला सांगत आहेत. बरं, ह्या काळात जो घरातले दिवे मालवणार नाही.. बाहेरचे दिवे लावणार नाही.. तो देशद्रोही ठरणार का?.. देशप्रेमाचं मापन इतकं तकलादू आहे का? कुणी काही बोललं की, “राजकारण करण्याची ही वेळ नाही.” असा समंजस सल्ला द्यायला अनेकजण सरसावतात. मात्र ह्या बिकट स्थितीतही भाजपाने राजकारणाचे सगळे उच्चांक मोडीत काढले आहेत. कोरोना देशात शिरकाव करत होता. तेव्हा हे कोडगे मसिहा मध्यप्रदेशात सत्ता स्थापनेचे राजकारण करण्यात मशगूल होते.

भाजपच्या नेत्यांनी मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये न देता भाजपा फंडात जमा करण्याचे आदेश कुणी काढले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला विरोध करणारे आजचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी हे करावं?. आणि कोणत्या नेत्याने किती दिले आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला?.. बरं, तेही नको.. मुख्यमंत्री निधीबद्दल बोलल्यावर, “मुख्यमंत्री भीक मागताहेत.” अशी आवई कुणी उठवली?.. का?.. तर मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, हा पोटशूळ आहेच. त्यामुळे ह्या निमित्ताने पुन्हा, “हे काही जनतेच्या मनातले सरकार नाही. आम्ही सहकार्य करणार नाही.” अशा आरोळ्या ठोकणारे ढिगाने आहेत.

वेतन कपात सहन करायलाही जनता तयार आहे. मात्र त्यातही, “ही वेतन कपात आम्ही का सहन करायची? मुख्यमंत्री आता आमच्याकडून भीक का मागताहेत?” असा टाहो फोडणारेही आहेतच की.. बरं, ही वेतन कपात मुख्यमंत्री हौसेने करत आहेत का?.. देशाच्या पंतप्रधानाने आर्थिक स्थितीवर कोणते नियंत्रण ठेवले आहे?.. केंद्रातील अर्थ मंत्री कुठे आहेत आता?.. तशात कोरोनाचे संकट सध्या केंद्रातील सरकारला आशीर्वाद बनून आलेलं आहे. कारण, देशातील आर्थिक मंदीचं खापर फोडायला त्यांना आयतंच कारण गवसलं आहे. जागतिक महामारीच्या रेट्यामध्ये आर्थिक महामारी व्यवस्थित गुंडाळली जाणार आहे.

वाचा  भारतातील रुग्णांचा आकडा अमेरिका, चीनपेक्षा कमी, पण..

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे राहू द्या. पण, पंतप्रधान सहाय्यता निधी (पीएम रिलीफ फंड) अस्तित्त्वात असताना पुन्हा “पी एम केअर फंड” हा नवा प्रकल्प निर्माण करून, त्याचे नवीन बँक खाते सुरू करून त्यामध्ये निधी जमा करवून घेण्याची काय आवश्यकता होती? कारण अगदी स्पष्ट आहे. हिशोब दाखवावे लागतील. शिवाय विरोधी पक्ष देखरेख करणार, हे दडपण असणारच ना.. संचारबंदीच्या काळात नितीन गडकरी यांनी केलेल्या टोलमाफीची बातमी दोन दिवस दर तासाला झळकवणार्‍या मिडियाने मुख्यमंत्री करत असलेल्या कामाचा आढावाही तेवढाच जाणीवपूर्वक दाखवत राहिलं पाहिजे.

आता कुणी हे सुद्धा बोलू शकत नाहीय, की “मोदींच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही नकार देतो.” कारण, अनेकदा आम्ही सहमती पण दर्शवली आहे. २२ मार्चच्या “सद्भावना” व्यक्त करण्याच्या म्हणण्याला मी स्वतः सहमतीची पोस्ट लिहिली होती. मात्र, तयारी केवळ टाळी वाजवण्याची दर्शवली होती. थाळीनादाचं समर्थन नव्हतं केलं. आणि पाच मिनिटे टाळ्या वाजवल्याही होत्या. पण, मोदींच्या थाळीनादाने घातलेले गोंधळ जगभरात गाजलेच. शिवाय, रस्त्यावर उतरलेले जमाव, मिरवणुका यांमुळे रुग्णांची संख्या वाढण्यालाही हातभार लागला. आता कळीचा मुद्दा.. जो भाजपा समर्थकांकडून इस्पिकचा एक्का म्हणून टाकला जातोय. “मरकज प्रकरण, नर्स समोर नग्न होणे, डॉक्टरांवर थुंकणे, पोलीस डॉक्टर यांना मारहाण करणे.. यांविरोधात न बोलणारे मोदींच्या थाळीनाद आणि दिवे लावण्याला विरोध करत आहेत.” असा कंठशोष करताहेत. त्यांना स्पष्ट शब्दात सांगणं आहे की, ह्यातील कोणत्याही कृतीचे कुणीही समर्थन केलेले नाहीय. प्रत्येक कृतीला विरोधच केलेला आहे. निषेधच आहे त्या सगळ्याचा.. फक्त त्या निषेधाच्या तुलनेत ही पोस्ट एवढी मोठी का?.. तर.. त्या चुका करणारा जमाव आणि पंतप्रधान असणारी व्यक्ती यांच्यात काहीतरी फरक आहेच ना. मग पंतप्रधान पदावरून आणि तथाकथित सत्ताधार्‍याकडून होणार्‍या चुकांसाठी केवळ दोन ओळीत लिहून कसं भागणार?.. योग्य सन्मान तर व्हायलाच हवाय ना.. बरं, मरकज असो की अजून काही.. स्वतः पंतप्रधान तर त्यावरही काहीच बोलले नाहीत, ह्याकडेही आम्हीच लक्ष द्यायचं का?

वाचा  पुण्यात आढळले "कोरोना"चे दोन रुग्ण

१३० करोड लोकांना दिवे लावण्याचे आवहन करणार्‍या नरेंद्र मोदी यांना थेट सवाल आहे. १३० पैकी किती जनतेला दररोजचे दोन वेळचे योग्य अन्न मिळते आहे. कुठल्या बाल्कनी आणि गॅलरीच्या गमजा करताय तुम्ही मोदीजी.. इथे आजही ३० टक्के भारत खुल्या आभाळाखाली रस्त्याच्या कडेला स्वतःचा जीव जगवण्याची धडपड करतोय. त्यांच्या घरात चुली पेटत नाहीत, तिथे तुम्ही दिवे काय पेटवायला सांगताय? बरं, जो इव्हेंट करायला सांगताय. त्यासाठी जनतेची मानसिकता ही तर दूर राहिली. तसंही तुम्ही इथल्या जनतेला मेंढरंच समजता. पण, देशातली तंत्र व्यवस्था तरी तेवढी सक्षम आहे का?.. याचा तरी आढावा घेतलाय का तुम्ही?.. की, “आलं मनात की राबवा जनात” एवढा उत्साह बरा नसतो.

हे सगळं व्यवस्थित करून जर दिवा लावायला सांगितलं असतं, तर आम्ही ते नक्कीच केलं असतं. पण, त्या दिवे लावण्यातही भाजपाचं राजकारण आहे. आता पाच एप्रिलची आणखी एक मेख लक्षात घ्या. ६ एप्रिल १९८० हा दिवस ऑक्टोबर १९५१ साली शामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघातून “भारतीय जनता पक्ष” निर्मितीचा आहे. यंदा ६ एप्रिलला ह्या घटनेला चार दशके (४० वर्षे) पूर्ण होत आहेत. त्याची पूर्वसंध्या समस्त देशवासियांकरवी साजरी करून घेण्याचा करंटा स्वार्थी विचार ह्या इव्हेंटमध्ये आहे. घरातले दिवे त्यासाठीच बंद करायचे आहेत, कारण बाहेर उजळलेला उत्सवी भारत ह्यांना हवाय. स्वतःच्या घरात अंधार करून ह्यांच्या पक्षासाठी उत्सव साजरा करायचा? इथे देशात प्रायोरिटी कोणत्या असायला हव्या आहेत? आणि नरेंद्र मोदी काय करायला सांगत आहेत. अशा परिस्थितीत एका राजकीय पक्षाच्या स्वार्थासाठी अधिकतर उपाशी जनतेने उधारीतले दिवे का जाळायचे? बरं, आम्ही भाजपाचा वर्धापन दिन साजरा केलाही असता. पण, भाजपानेच असे कोणते दिवे लावले आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही दिवे उजळवावेत?

ह्याहून अधिक काही लिहिण्याची आणि बोलण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. दिवा आणि त्यामागचे विज्ञान, दिव्यांची उर्जा, प्रकाशाची महती.. ह्यामागील शास्त्रोक्त संगत, भावना सगळं मान्य असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवहनाला “सविनय असहकार” हीच भूमिका आहे. हा इव्हेंट साजरा करणार नाही म्हणजे नाहीच.

  • जनार्दन केशव
Download App