सोयामील निर्यात घटल्याने सोयाबीनच्या दरात घसरण

Smiley face 2 min

ई ग्राम : सोयामील निर्यातीत झालेली घट, सोयातेलाचे घटलेले दर आणि रब्बी तेलबियांची संभाव्य आवक यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. विविध अनुमानानुसार किमान आठ ते दहा लाख टन सोयामिल निर्यात चालू हंगामात अपेक्षित होती. मात्र देशांतर्गत सोयामिलचे भाव स्पर्धक निर्यातदारांच्या तुलनेत शंभर डॉलरने वाढले. परिणामी, ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत सोयामिल निर्यातीचा वेग धीमा आहे. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशनकडील माहितीनुसार, एप्रिल ते जानेवारी या कालावधीसाठी चालू आर्थिक वर्षांत सोयामिलची निर्यात ५ लाख ७५ हजार टन आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत १० लाख १० हजार टन सोयामिल निर्यात झाली होती.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कच्चे पामतेल आणि रिफाइन पाम तेलाच्या आयातीवरील शुल्क कमी करण्यात आले. यामुळे स्वस्त खाद्यतेलाच्या आयातीची शक्यता वाढली. दरम्यानच्या काळात मलेशियातील पामतेलाच्या आयातीवर अप्रत्यक्षरीत्या निर्बंध आले असले, तरी इंडोनेशियातील आयात सुरळीत राहणार असल्याचे चित्र आहे. यामुळे स्वस्त खाद्यतेल आयातीवृद्धीचा दबाव कायम आहे. याचाही प्रभाव आजघडीला सोयाबीनच्या किमतीवर दिसत आहे.

वाचा  निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर कोट्यात २० टक्के कपात

रब्बी तेलबियांची संभाव्य आवकही सोयाबीनच्या बाजारभावावर दबाव टाकत आहे. देशात ६९ लाख हेक्टर मोहरीची पेरणी झाली आहे. नाफेडकडे जुन्या मोहरीचा मोठा साठा आहे. किमान आधारभूत किमतीअंतर्गत ही खरेदी झाली आहे. दुसरीकडे, भुईमुगाचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढला असून, एकूण क्षेत्र ४.५ लाख हेक्टरपर्यंत पोचले आहे. या वर्षी नाफेडने पाच लाख टनापर्यंत भुईमूग खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

वाचा  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्ह्यातच स्वतंत्र कार्यालय सुरु करा – अंकिता पाटील

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ४२ लाख टन सोयाबीनची आवक झाली. त्यातील २१ लाख टन सोयाबीनचे क्रशिंग झाले. यावरून आवकेतील मोठा भाग स्टॉकिस्टकडे वळता झाल्याचे स्पष्ट होते. प्रति क्विंटल ३८०० रूपये या दरात झालेला स्टॉक माल ४५०० रुपयांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर विक्रीस आला. पुढील आठ महिन्यातील देशांतर्गत गरजेच्या तुलनेत पुरेसा साठा असल्याचे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

भारत खाद्यतेलाची आयात करतो आणि ढेप वा पेंड (डीओसी) यांची निर्यात होते. सोयाबीनसह एकूणच तेलबियांचा बाजार हा खाद्यतेलाची आयात आणि ढेपेच्या निर्यात पडतळीनुसार ठरतो. मागील दोन महिन्यांत आयात-निर्यात पडतळीचा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावावर मोठा प्रभाव राहिला आहे.

वाचा  अतिवृष्टीच्या मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत होता. महिनाभरात पाचशे रुपयांची वाढ झाली. हंगामाच्या प्रारंभी, सोयाबीनची आवक धिम्या गतीने होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन उत्पादनातील घटीच्या रिपोर्ट्समुळे स्टॉकिस्ट खरेदीलाही बळ मिळाले. परिणामी, अल्पावधीतच सोयाबीनच्या बाजाराला गती मिळाली. मात्र बाजारात तेजीची चाल जास्त काळ टिकू शकली नाही.

खाद्यतेलाची वाढती आयात आणि सोयामिलची घटत्या निर्यातीमुळे सोयाबीनचे बाजारभाव दबावात दिसत असले तरी सध्याच्या भाव पातळीवरून खूप मंदी यावी अशी परिस्थिती नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत असणारे निर्यातयोग्य आधिक्य १० टक्क्यांपर्यंत घटले आहे. हे अधिक्य कॅरीफॉरवर्ड होणे शक्य असल्याने खूप मोठी पडझड अपेक्षित नाही.

Download App