उसाचे उत्पादन 3200 हेक्टरने घटले; तोडणीला विलंब होत असलेल्याचा परिणाम

Smiley face < 1 min

ई-ग्राम, सातारा (प्रतिनिधी): जिल्ह्यात आडसाली ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल काहीसा कमी झाला आहे. जिल्ह्यात आडसालीची १७ हजार १५५ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आडसाली ऊस लागवड क्षेत्रात ३२४० हेक्टरने घट झाली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागातही पाण्याची उपलब्धतता आहे. तसेच इतर पिकांच्या तुलनेत उसाला शाश्‍वत दर मिळत असला तरी आडसाली उसाचा कालावधी, तुटण्यास होत असलेला विलंब व अपेक्षित उत्पादन यामुळे प्रामुख्याने आडसाली ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा काहीसा कल कमी झाला असल्याचे दिसून येत आहे.

वाचा  जिल्हा परिषदेतील ‘अनुकंपा'साठी मंगळवारी कागदपत्रांची पडताळणी


आडसाली उसाचे क्षेत्र कमी झाल्याने कारखान्यांचे ऊसतोडणीचे वेळापत्रकात अडचणी येणार असून साखर उताराही कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आडसाली हंगामाअखेर १७ हजार १५५ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आडसाली ऊस लागवड क्षेत्रात ३२४० हेक्टरने घट झाली आहे. लागवड झालेल्या उसामध्ये को ८६०३२ या वाणाची सर्वाधिक लागवड असून त्यानंतर एमएस १०००१ या ऊस जातींस प्राधान्य दिले आहे. कऱ्हाड, फलटण, सातारा या तालुक्यात सर्वाधिक लागवड झाली आहे. ऊस लागवडीचा पूर्व हंगाम संपला असून या हंगामात २१ हजार २६८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. ही लागवड गतवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात जास्त आहे.

वाचा  जालना जिल्ह्यात साडेआठशे हेक्‍टरला अवकाळीचा फटका

जिल्ह्यात ६२ लाख क्विंटल साखरेची निर्मिती: जिल्ह्यात कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने ऊस शिल्लक राहण्याची भीती कमी झाली आहे. या हंगामात जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडून उसाचे वेगात गाळप सुरू असून एक मार्च अखेर ५५ लाख ८२ हजार मेट्रिक टन ऊसगाळप करत ६२ लाख ६५ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

Download App