दहावीचा भुगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी, अकरावीचा निर्णय वाचा!

Smiley face < 1 min

ई ग्राम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारे दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याबाबत शिक्षण मंडळाची समिती निर्णय घेणार आहे.

दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्चदरम्यान घेण्यात येणार होती; मात्र कोरोनाचे संकट पाहता केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केला.
त्यामुळे २३ मार्च रोजी होणारी भूगोलाची परीक्षा पुढे ढकलली. राज्यात १४ एप्रिलला लॉकडाऊन उठताच दहावी आणि इतर परीक्षांबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले होते: मात्र कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला. त्यामुळे शिक्षक संघटना आणि पालक भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते.

वाचा  लॉकडाऊनसंदर्भात ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी कसे निर्णय घेतात याबाबच्या काही नोंदी

अखेर शिक्षण विभागाने भूगोल, तसेच कार्यशिक्षण विषयाची परीक्षा रद्द केली आहे. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, नववी व अकरावीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा न घेता पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा  शेतकऱ्यांवर ढगांच सावट

निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
भूगोल विषयाची परीक्षा रद्द केल्यानंतर या विषयाला गुण कसे मिळणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एक समिती निर्णय घेईल. निकालाची तारीख निश्‍चित होण्यापूर्वी हा निर्णय होईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सांगितले.

पेपर रद्दचा पहिलाच निर्णय
राज्यात बहुदा पहिल्यांदाच एक पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी दहावी परीक्षेचे पेपर हरवणे; तसेच इतर गोंधळांमुळे विद्यार्थ्यांना गुण देण्याचे निर्णय मंडळाने घेतले आहेत.

देशभरात निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक परीक्षांवरही परिणाम झाला. काही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक चिंतेत होते. लॉकडाऊनचा काळ व कोरोनाचे संकट पाहता पेपर रद्द करण्याची आवश्‍यकता होती. सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार आहे.

वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ.
Download App