आरोग्य खात्याच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ९ लाख २५ हजार लोकांचे ट्रेसिंग

Smiley face 2 min

ई ग्राम : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५३७ वर गेला आहे, तर ५० रूग्ण बरे झाले आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रूग्णांचा आकडा वाढत असला तरी संचारबंदी व लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची काळजी राज्य सरकार घेत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम सुरू आहे. आरोग्य खात्याच्या माध्यमातून आतापर्यंत ९ लाख २५ हजार लोकांचे ट्रेसिंग करण्यात आले असून ट्रेसिंग करण्यासाठी मुंबईत २९० केंद्रे तर राज्यभरात २४५५ केंद्रे उभारण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली. या प्रक्रियेत सहकार्य करा, त्यांना योग्य पद्धतीनं प्रतिसाद द्या, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं.

वाचा  कोरोनामुळे जागतिक बँक भारताच्या मदतीला

आपल्याकडे संसाधनं कमी असल्याचं मत काहीजण व्यक्त करत आहेत. परंतु, आपल्याकडे पीपीईच्या २५ हजार कीट्स, अडीच लाखांहून अधिक एन ९५ मास्क, सुमारे दीड हजार व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून १ एप्रिलपासून राज्यात ५० बेड्सच्या वरची १००० रुग्णालये आपण इम्पॅनल्ड केलेली आहेत. त्याच्या माध्यमातून जवळपास २ हजार नवीन व्हेंटीलेटर्स उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील सुमारे सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहितीही सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

वाचा  ‘गेम थियरी’, ‘नॅश इक्वीलीब्रीयम’ आणि शेतीतील डिसिजीन मेकिंग-

कोरोना बाधित रुग्णांना, तसेच वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही कमी पडू देणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे. याकरता पीपीई, एन ९५ मास्क निर्माण करणाऱ्या एकमेव कंपनीचे उत्पादन वाढवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. केंद्र सरकारने देखील याकरता मदत करण्याची भूमिका घेतल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

कोरोना या आजारावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं असून सी जीवनसत्वांचा आहारात समावेश करणं, गरम पाणी पिणं, पोषक आहार घेणं आणि घरी व्यायम करणं, या गोष्टींचा अवलंब करावा अशी विनंतीही राजेश टोपे यांनी यावेळी केली.

वाचा  सोयाबीन पीकविमा तातडीने द्यावा

तबलिगींच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे १२२५ जण सहभागी झाले होते. त्यातील १०३३ लोकांची माहिती सरकारला मिळाली आहे. यातून ७३८ लोकांचे विलागिकरण केले असून यात केवळ ७ लोकांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांचे विलगीकरणात करून आजाराचा फैलाव रोखण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. पुढील काळात अनेक सण येत आहेत. हनुमान जयंती, महावीर जयंती, शब-ए-बारात तसेच अन्य सणांना लोकांनी घराबाहेर पडू नये, घरूनच आपली श्रद्धा व भक्ती व्यक्त करावी, असे आवाहनही राजेश टोपे यांनी यावेळी जनतेला केले.

Download App